kd Mumbai

बुकमार्क आणि डबलकिलर

वेगवेगळे बुकमार्क नव्या ब्राऊझरमध्ये कसे आणायचे, फाईल्स सेव्ह करताना काय काळजी घ्यायची, विनामूल्य सॉफ्टवेअर, परदेशांतील वेळ आदी गोष्टी कशा मिळवायच्या याचा सोदाहरण घेतलेला वेध...
....

इंटरनेट एक्स्प्लोरर (आयई)ऐवजी फायरफॉक्स वापरा असे मी अनेक वेळा सांगितले आहे. पण असा ब्राऊझर बदलताना आधीच्या ब्राऊझरमध्ये कष्टाने जमविलेले बुकमार्क नव्या ब्राऊझरमध्ये कसे आणायचे? एकेक आणत बसायचे तर ते खूप वेळखाऊ असते. त्यापेक्षा ही सोपी पद्धत अवलंबायला हरकत नाही. समजा तुम्ही आयई वापरता आहात आणि त्यातले बुकमार्क तुम्हाला फायरफॉक्समध्ये ट्रान्स्फर करायचे आहेत. आयई उघडा. 'फाईल'मध्ये जाऊन एक्स्पोर्टवर क्लिक करा, नंतरच्या बॉक्समध्ये फेवरिट्सवर क्लिक करा व पुढे जा. ती एचटीएम फाइल कुठे सेव्ह करायची ते ठरवा. समजा डेस्कटॉप. ओके म्हणा व आयई बंद करा. फायरफॉक्स उघडा. फाईल इम्पोर्ट म्हणा. डेस्कटॉपवरील फाइल निवडा व ओके म्हणा. क्षणार्धात सारे बुकमार्क तुमच्या सेवेला हजर.

आता फायरफॉक्सचे ३.५ व्हर्जन उपलब्ध आहे. त्यात तर हेही करावे लागत नाही. फाईलवर क्लिक केल्यावर इम्पोर्ट म्हणा. कोणत्या ब्राऊझरमधून इम्पोर्ट करायचे आहे ते ठरवा. नंतर पुढच्या बॉक्सवर जाऊन कायकाय इम्पोर्ट करायचे आहे ते ठरवा. ओके म्हणा की झाले सारे इम्पोर्ट. जवळपास सर्वच ब्राऊजर नव्याने डाऊनलोड करताना बुकमार्क आपोआप ट्रान्स्फर करण्याची सोय देतातच. त्यामुळे काळजीचे कारण नाही.

****
आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या फाइल ओपन करतो व बंद करतो. एकाच ठिकाणी एकाच नावाच्या दोन फाइल्स सेव्ह करता येत नाहीत हे उघडच आहे. म्हणून आपण त्याच प्रकारच्या फाइल्स वेगवेगळ्या प्रकारात सेव्ह करतो. पण नंतर कधी सर्च दिला तर आपण एकाच नावाच्या फाइल का सेव्ह केल्या आहेत असा प्रश्न पडतो. कधीकधी आपण बॅकअपच्या हेतूने या फाइल्स वेगवेगळ्या ड्राइव्हमध्ये सेव्ह केलेल्या असतात. अशा फाइल्सची संख्या वाढली की फोल्डरसाइझ वाढतो व मशीन स्लो होते. फाइलचे नाव सारखे असल्याने अशा वेळी कोणती फाइल डिलिट करावी आणि कोणती ठेवावी हे कळत नाही. अशा वेळेस 'डबलकिलर' हे अॅप्लिकेशन उपयोगी पडते. ते डाऊनलोड करून घ्या. रन केल्यावर एकाच फाइलनेमच्या किती फाइल मशीनमध्ये आहेत, त्याचा साइझ, तारीख काय आहे हा सारा तपशील तुमच्या समोर येईल. मग नको असलेल्या फाइल्स डिलीट करा. मात्र ते करताना काळजी घ्या. कारण एखादी लेटेस्ट फाइल डिलिट होईल आणि आधीची अनकरेक्टेड राहील.

मी या कॉलममधून अनेक सॉफ्टवेअरचा उल्लेख करतो. परंतु, सगळी सॉफ्टवेअर चकटफु नसतात. मग त्या सॉफ्टवेअरला पर्यायी असे चकटफु पण परिणामकारक सॉफ्टवेअर उपलब्ध आहे का असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडू शकेल. त्यासाठी 'आल्टरनेटिव्हटू' ही साइट तुमच्या सेवेला हजर आहे. 'आल्टरनेटिव्हटू डॉट नेट' टाइप करून या साइटवर जा. विविध सॉफ्टवेअरचा खजिनाच तुम्हाला दिसेल. प्रत्येक महागड्या सॉफ्टवेअरला पर्याय काय ते तुम्हाला दिसेल. कुठले सॉफ्टवेअर डाऊनलोड करू आणि कुठले नको असे तुम्हाला होईल. प्रत्येक सॉफ्टवेअरचा तपशील दिलेला आहे. त्याप्रमाणे व तुमच्या मशीनच्या कुवतीनुसार कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या.

तुम्ही इंगजीतून काही टाइप करत आहात. सगळे शब्द स्मॉल कॅप्समध्ये टाइप केल्यावर तुमच्या लक्षात आले की पहिले अक्षर कॅपिटल हवे. मग काय कराल? तो शब्द सिलेक्ट करा आणि शिफ्ट व एफ ३ ही बटन्स एकदम दाबा.

सध्या युएसओपन टेनिस स्पर्धा चालू आहे. त्याचे सामने कोणत्या वेळेला चालू आहेत हे जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो. पण आपल्याकडे किती वाजले की तिकडे सामने सुरू होतात हे समजून घ्यायचे असेल तर तिकडची वेळ माहीत असायला हवी. त्यासाठी 'टाइमअँडडेट डॉट कॉम' या साइटवर जा. तिथे रजिस्टर करणे बंधनकारक नाही, पण सेटिंग्ज सेव्ह करायची असतील तर रजिस्टर केलेले बरे! नंतर पर्सनल र्वल्ड क्लॉक, साइट कॉन्फिगरेशनवर क्लिक करा व योग्य ते सेटिंग करा. तुम्हाला हव्या त्या शहराची वेळ तुमच्या समोर येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: