kd Mumbai

नव्या साइट्स!

इंटरनेटचा पसारा खूपच मोठा आहे. त्यामुळेच चांगल्या साइट्स आहेत तरी कोणत्या असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्याची आणि इतरही प्रश्नांची केलेली उकल...
......

इंटरनेटवर गेल्यावर आपल्याला काय शोधू आणि काय नाही असे झालेले असते. सगळ्याच चांगल्या साइट्स आपल्याला माहीत असतील असे नाही. कारण इंटरनेटचा पसारा इतका मोठा आहे की त्यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळणे केवळ अशक्य आहे. तरीही तुमच्या इंटरेस्टच्या चांगल्या साइट्स कोणत्या हे जाणून घ्यायची इच्छा असली तर? त्यासाठी www.stumbleupon.com ही साइट तयार आहे. या साइटवर गेल्यावर शेकडो माहितीपूर्ण साइट्सचा खजिना मिळेल. ती साइट ओपन केल्यावर 'साइन अप हिअर' या बटनावर क्लिक करा, पुढे विचारण्यात येणारी आवश्यक ती (ईमेल, पासवर्ड वगैरे) माहिती भरा. तुम्हाला कोणत्या विषयात रस आहे ते निवडा की मोठा खजिना तुमच्यापुढे खुला झालाच म्हणून समजा. 'आयई ८' वापरत असलात तरी स्टम्बलअपॉनचा टूलबार लोड करता येईल. ते झाले की इंटरनेट सफिर्ंगची मजा वाढेल आणि आपण फार मर्यादित स्वरूपात इंटरनेटचा वापर करत होतो हे लक्षात येईल.

अधिकृत विंडोज - या नेटभेट सदरावर बऱ्याच वाचकांच्या प्रतिक्रिया येत असतात. प्रफुल्ल सबनीस यांनी असे विचारले आहे की, मशीन सुरू केल्यावर डी आणि एफ ड्राइव्हमधल्या फाइल्स चेक करा असा मेसेज येत राहातो. तशा त्या चेक केल्यावरही प्रत्येक वेळेस मेसेज येतोच. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या दुसऱ्या प्रश्नात आहे. त्यांनी मशीनमध्ये लोड केलेली विंडोज सिस्टिम अधिकृत नाही, पायरेटेड आहे असा मेसेजही त्यांना येतो. (धिस कॉपी ऑफ विंडोज डिड नॉट पास जेन्युइन विंडोज व्हॅलिडेशन). विंडोज अधिकृत नसल्यावर तो क्रॅश होण्याचा संभव असतो. म्हणून कधीही पायरेटेड विंडोज बसवून घेऊ नये. तसे केल्यास व्हायरसना आपणच मशीनमध्ये येण्यास आमंत्रण देतो. सिक्युरिटी अपडेट्स मिळत नाहीत आणि मशीन खेळण्यातले मशीन होऊन जाते. त्यांचा तिसरा प्रश्नही याच्याशीच निगडित आहे. मशीन फास्ट कसे चालेल? मशीन फास्ट चालण्याचा सोपा मार्ग म्हणजे डिफ्रॅगमेंटेशन करणे (डेस्कटॉपवरच्या 'माय कम्प्युटर'वर डबल क्लिक. नंतर सी ड्राइव्हवर राइट क्लिक करून प्रॉपटीर्जवर जा, नंतर टूल्स आणि मग डिफ्रॅगमेंटेशन ) आणि नको असलेल्या फाइल cleaner ची मदत घेऊन काढून टाकणे. याचा ज्येन्युइन अथवा पायरेटेड विंडोजशी संबंध नाही. महिन्यातून एकदा तरी सर्वांनीच ही प्रक्रिया केली पाहिजे.

आल्टरनेटिव्हटू - मागच्या लेखात मी आल्टरनेटिव्हटू या साइटबद्दल लिहिले होते. बऱ्याच वाचकांनी ही साइट मिळत नसल्याची तक्रार केली होती. बहुतेकांनी नुसते आल्टरनेटिव्ह डॉट नेट असे टाइप केल्याने ही चूक होत होती. ती आल्टरनेटिव्हटू डॉट नेट अशी साइट आहे.

डिबगिंग म्हणजे काय? - अनिल नेरकर यांनी विचारले आहे की त्यांना 'रनटाइम एरर हॅज ऑकर्ड, डू यू विश टू ओपन डिबग' अशा आशयाचा मेसेज येतो. डिबगिंग म्हणजे एखाद्या कम्प्युटर प्रोग्राम अथवा इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरमध्ये काही दोष असतील तर ते दूर करण्याची प्रक्रिया. असा मेसेज आला आणि डिबगिंगला 'यस' म्हटले तरी काही बिघडणार नाही. उलट दोष दूर व्हायला मदतच होईल.

डिस्क फॉरमॅट - शरद कंटक यांनी एखादी डिस्क फॉरमॅट केल्यावर त्यावर आधी सेव्ह केलेला डाटा पुन्हा मिळू शकतो का असे विचारले आहे. याचे उत्तर 'नाही' असेच आहे. एकदा डिस्क फॉरमॅट केली की त्यावरचा डाटा मिळवणे अशक्य असते. म्हणूनच डिस्क फॉरमॅट करण्याआधी त्यावरचा आवश्यक डाटा दुसरीकडे सेव्ह करणे गरजेचे असते. मात्र समजा तुमचा कम्प्युटर क्रॅश झाला म्हणजेच तुमची एखादी डिस्क उडाली तर त्यावरचा डाटा काही प्रमाणात रिकव्हर करणे शक्य असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: