कम्प्युटर्सच काय तर मोबाइलचंही कामकाज बंद पाडू शकणा-या, त्यात अडथळे आणणा-या 'व्हायरस'शी आपला सगळ्यांचाच एव्हाना परिचय झाला आहे. 'व्हायरस' नावाची ही भानगड असते काय, त्याची सुरूवात कुठून कशी झाली, त्याविषयी-
माणसाला अनेक प्रकारचे विषाणू त्रस्त करून सोडतात. त्यांच्यापैकी तर काही जिवावर बेततात! कम्प्युटर्सनादेखील अनेक प्रकारचे विषाणू हैराण करू शकतात. कम्प्युटरवर अशा विषाणूंनी हल्ला केल्यावर त्याचे चित्रविचित्र प्रकार सुरू होतात. कधी कधी कम्प्युटर सुरूच होत नाही, तर कधी चालू झाल्यावर कासवगतीनं चालतो. कधी त्याच्या पडद्यावर चित्रविचित्र अक्षरं किंवा आकृत्या नाचायला लागतात. तर कधी एरर मेसेजेसनी आपण पुरते वैतागून जातो. इतकंच काय अलिकडे मोबाइल फोन्ससुध्दा कम्प्युटर्सच्या विषाणूंना बळी पडतात. साऱ्या जगातले कम्प्युटर्स तसंच अख्खं इंटरनेट तात्पुरतं नेस्तनाबूत करू शकणाऱ्या या विषाणूंचं तांत्रिक नाव म्हणजे 'कम्प्युटर व्हायरस'. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्या नकळत एका कम्प्युटरवरून दुसऱ्या, मग तिसऱ्या, चौथ्या कम्प्युटरवर असा पसरत जाणारा एक प्रोग्रॅम म्हणजेच हा व्हायरस. तो जाईल तिथे त्या कम्प्युटरच्या कामात अनेक प्रकारची विघ्नं आणतो. ती विघ्नं इतकी त्रासदायक असतात की तो कम्प्युटर वापरणारा पुरता बेजार होऊन जातो! मग त्या व्हायरसचा नायनाट करणं, ते पसरू नयेत म्हणून खबरदारी घेणं यासाठी आपण 'अॅन्टिव्हायरस सॉफ्टवेअर' विकत घेतो.
अगदी पूवीर्चे व्हायरस तसे बऱ्यापैकी सुसह्य असायचे. फ्लॉपीवरून कम्प्युटर फाइल्स एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवर कॉपी करत असताना त्यातून व्हायरसेसचा संसर्ग व्हायचा. पण हे सोडून त्यांचा फारसा प्रसार व्हायचा नाही. याचाच दुसरा अर्थ असा की त्या व्हायरसेसमुळे कम्प्युटरच्या कामात बरेच अडथळे निर्माण होऊ शकत असले तरी त्यांचा प्रसार माणसांच्या कृतीतूनच (फ्लॉपीतून फाइल्सची ने-आण करणं) होई. आत्ताचे बहुतेक सगळे व्हायरसेस ई-मेल्सच्या माध्यमातून पसरतात. कोणीतरी ई-मेलमधून व्हायरस पाठवतं. ती ई-मेल उघडायचा मोह साऱ्यांनाच व्हावा म्हणून त्यात आकर्षण वाटावा असा मजकूर पेरून ठेवलेला असतो. (उदा. मल्लिका शेरावतचा फोटो बघण्यासाठी ई-मेलमधल्या चित्रावर डबल क्लिक करा) त्या ई-मेलला जो बळी पडतो त्याच्या कम्प्युटरमध्ये तो व्हायरस प्रवेश करतो. इतकंच नव्हे तर त्या कम्प्युटरचा वापर करणाऱ्या माणसाच्या ई-मेल अॅड्रेसबुकमध्ये ज्यांचे ई-मेल अॅड्रेसेस असतील त्या सगळ्यांना ही व्हायरसवाली ई-मेल हा व्हायरसच पाठवून देतो. त्यामधलं जे कोणी ही ई-मेल उघडेल, त्याच्या बाबतीत हेच घडतं. आणि प्लेगच्या साथीसारखा हा कम्प्युटर व्हायरस प्रचंड वेगानं पसरत जातो!
पूवीर्च्या काळी फक्त गेम्स, चित्रं, व्हीडिओ अशा प्रकारच्या फाइल्समधून व्हायरसेस पसरायचे. त्यामुळे अशा प्रकारच्या फाइल्स कॉपी न करणं किंवा न उघडणं हा उपाय पुरत असे. पण नंतर चक्क मायक्रोसॉफ्ट वर्डची डॉक्युमेंटस् किंवा एक्सेलमधली स्प्रेडशीटस् अशा अनेक प्रकारच्या फाइल्समधूनसुध्दा व्हायरसेस धडाधड पसरायला लागले. त्यातलाच एक प्रकार म्हणजे 'मॅक्रोव्हायरस'! 'मॅक्रो' हा एक छोटासा प्रोग्रॅमच असतो. हा प्रोग्रॅम डॉक्युमेंंट्स, स्प्रेडशीट्सवर काम करतो. व्हायरस लिहिणारी मंडळी या प्रोग्रॅमवरच हल्ला चढवतात.
अलिकडच्या काळात 'ट्रॉजन हॉर्स' नावाचा अतिशय घातक प्रकारचा व्हायरससारखा प्रोग्रॅम कम्प्युटर्सवर हल्ला चढवतो. त्याचाच एक प्रकार म्हणजे 'रिमोट अॅक्सेस ट्रॉजन (रॅट)' नावाचा एक हल्ला. अशा प्रकारच्या हल्ल्यात आपल्या कम्प्युटरवरच्या फाइल्स उडवणं, माहिती दुसरीकडे पाठवून देणं वगैरे अनेक प्रकार घडू शकतात. किंबहुना, बसल्या ठिकाणाहून, हजारो किलोमीटर्सवरून हल्लेखोर या रॅटच्या माध्यमातून आपल्या कम्प्युटरवर लक्ष ठेवू शकतो. तसंच त्याच्याकडून हवी ती कामं करून घेऊ शकतो. (उदाहरणार्थ, पासवर्ड चोरणं, फाइल्स मिळवणं वगैरे).
' वर्म' हा हल्ला चढवायचा व्हायरस आणि ट्रॉजनसारखा तिसरा प्रकार. या 'वर्म'चं वैशिष्ट्य म्हणजे व्हायरस किंवा ट्रॉजनसारखी ही वर्म आपल्या कम्प्युटरमधल्या फाइल्स उडवणं वगैरे प्रकार करत नाही. पण तिचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे आपल्या कम्प्युटरमधल्या महत्त्वाच्या गोष्टी (उदाहरणार्थ, सीपीयूचा वापर, मेमरी) गिळंकृत करणं. त्यामुळे ही वर्म बाकीच्या नेहमीच्या प्रोग्रॅम्सना जागाच ठेवत नाही. मग ते प्रोग्रॅम्स 'सखी मंद झाल्या तारका'च्या धतीर्वर मंद होत जातात. म्हणजेच एकदम हळू चालायला लागतात. आपण साधी कीबोर्डवर एक की दाबली तरी त्यासाठीचं अक्षर पडद्यावर उमटायला काही सेकंद लागायला लागतात.
हे सारे विषाणू इंटरनेटवरून जगभर पसरायला वेळ लागत नाही. २ नोव्हेंबर १९८८ रोजी कॉनेर्ल विद्यापीठातल्या रॉबर्ट मॉरिस नावाच्या विद्यार्थ्यानं गंमत म्हणून लिहिलेली 'वर्म' अचानक आगीच्या वणव्यासारखी पसरली आणि तिनं अमेरिकेतल्या ६ हजार कम्प्युटर्सवर हल्ला चढवला. अख्ख्या इंटरनेटला जवळजवळ बंद पाडलं आणि लाखो डॉलर्सचं नुकसान केलं! त्याचा परिणाम म्हणून मॉरिसला साडेदहा हजार डॉलर्सचा दंड आणि तीन वर्षं कैदेसारख्या बंदिवासात घालवायची शिक्षा मिळाली!
कम्प्युटर व्हायरसची सुरूवात १९७०च्या दशकात झाल्याचं मानलं जातं. 'क्रीपर' या नावानं ओळखला जाणारा हा व्हायरस 'टेनेक्स' नावाच्या कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टिमला बंद पाडायचा. त्यानंतर काही बारिकसारिक घटना सोडल्या तर रॉथर जे नावाचा व्हायरस एका स्वतंत्र संगणकावर हल्ला करणारा पहिला व्हायरस ठरला. १९८२ साली 'एल्क क्लोनर' नावाचा व्हायरस रिचर्ड स्क्रेंटानं अॅपल कम्प्युटर्ससाठी लिहिला. हा व्हायरस फ्लॉपी डिस्कवरून एक फाइल एका कम्प्युटरमधून दुसऱ्यावर कॉपी केल्यावर पसरे. त्यात एक गंमत अशी की, हा कम्प्युटर व्हायरस एका गेमच्या आत लपून बसे. तो गेम खेळणाऱ्याला ४९ वेळा त्या व्हायरसचा पत्ताच लागत नसे. पण ५०व्या वेळी तो गेम उघडला की हा व्हायरस जागृत होऊन कम्प्युटर बंद पाडे! १९८३ साली अशा प्रकारचे उद्योग करणाऱ्या कम्प्युटर प्रोग्रॅम्सना फ्रेडरिक कोहेननं 'व्हायरस' हे नाव दिलं. आणि हा शब्द प्रथमच वापरला गेला. अशा व्हायरसचं प्रात्यक्षिकसुध्दा कोहेननं दिलं. जानेवारी १९८६ मध्ये पाकिस्तानात १९ वर्षांचा बसित आणि फारूक अल्वी या भावांनी 'ब्रेन' किंवा 'पाकिस्तानी फ्ल्यू' या नावानं ओळखला जाणारा व्हायरस लिहिला. आयबीएमच्या प्रसिध्द 'पर्सनल कम्प्युटर (पीसी)'ला सतावू शकणारा हा पहिला व्हायरस होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा