kd Mumbai

मायक्रो याहू!

अमेरिकेतल्या दोन बलाढ्य कंपन्या. एक आहे मायक्रोसॉफ्ट; जगातील सुमारे ८० टक्के कम्प्युटर या कंपनीचीे ऑपेरेटिंग सिस्टिम वापरतात. दुसरी आहे, याहू; ऑनलाइन सेवा देणा-या जगातील सर्वात जुन्या लोकप्रिय कंपन्यांपैकी एक आणि गूगलनंतर दुसऱ्या स्थानावरचे सर्च इंजिन चालवणारी कंपनी असाही तिचा उल्लेख करता येईल. या दोन कंपन्यांमध्ये एकत्र येण्याची चर्चा होते, फिस्कटते आणि परत सुरू होण्याची शक्यता निर्माण होते, मग सर्वत्र बोलबाला होणारच. पण असे त्यांच्यात झाले तरी काय, ज्याच्यामुळे हा प्रकार घडला हे जाणून घ्यायचे तर थोडेसे भूतकाळात जावे लागेल.

मायक्रोसॉफ्ट ही १९७५ मध्ये स्थापन झालेली बिल गेटस् यांची कंपनी. कम्प्युटर सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या या कंपनीने बाजारात आणलेली 'मायक्रोसॉफ्ट विंडोज' ही ऑपरेटिंग सिस्टिम लोकप्रिय झाली. विंडोज ९५ पासून व्हिस्टापर्यंत कंपनीने मोठी प्रगती केली. मात्र इंटरनेटशी जुळवून घेईल (कम्पॅटिबल) ठरेल अशी ऑपरेटिंग सिस्टिम तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. एक्सपी व्हिस्टामध्ये बऱ्याच त्रुटी आढळल्या. काही कंपन्या कोणताही विधिनिषेध न बाळगता ताब्यात घेतल्याची टीका मायक्रोसॉफ्टवर झाली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याकडे नसलेले तंत्रज्ञान मिळवण्यासाठी आथिर्क ताकदीचा वापर करून एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न कंपनीने सुरू केला. त्याच सुमारास 'याहू' नावाची कंपनी सुरू झाली. जेरी यांग आणि डेविड फिलो यांनी १९९५ च्या मार्चमध्ये या कंपनीची नोंदणी करून याहू डॉट कॉम नावाची पोर्टल सेवा सुरू केली. सर्च आणि अन्य वैविध्यपूर्ण माहिती देणाऱ्या या पोर्टलची लोकप्रियता पाहून मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट नेटवर्क अर्थात एमएसएन डॉट कॉम हे पोर्टल ऑगस्ट ९५ मध्ये सुरू केले.

याहूने ९७ मध्ये फोर इलेवनचा रॉकेटमेल घेऊन याहू मेल सुरू केले. शिवाय गेमिंगसाठी क्लासिक गेम्स आणि मेसेंजरसाठी (चॅट सेवा देणारी) योयोडीन एन्टरटेनमेंट कंपनी ताब्यात घेतली. लगेच एमएसएनने जॅक स्मिथ आणि साबीर भाटियाचे हॉटमेल, फ्लॅश कम्युनिकेशनचे मेसेंजर आणि फासा इंटरअॅक्टिव्हची गेमिंग सेवा हे सारे विकत घेतले. कंपन्या ताब्यात घेऊन त्यांचं तंत्रज्ञान आपला ब्रँड म्हणून विकायला याहू आणि मायक्रोसॉफ्टने सुरूवात केली. स्पर्धा वाढत होती.

त्याचवेळी लॅरी पेज आणि सजीर् ब्रेन यांनी गूगल नावाचे सर्च इंजिन सुरू केले. हे याहू आणि एमएसएनसारखे पोर्टल नसल्यामुळे या कंपनीचा इंटरनेटच्या तत्कालीन बड्यांनी विचार केला नव्हता. त्यामुळेच गूगलने सुरुवातीच्या काळात याहूला, आमचा सर्च तुमच्या सर्च इंजिनवर गूगल पॉवर सर्च या शीर्षकाखाली दाखवण्याची विनंती केली. त्या बदल्यात गूगल याहूला मोठी रक्कम देण्यास तयार झाली. गूगलचा प्रयोग यशस्वी झाला. याहूपेक्षा गूगल सर्च अचूक असल्याची जाणीव नेट वापरणाऱ्यांना झाली. मात्र प्रकल्पाचा वाढता खर्च कसा परवडणार अशा विचारातून गूगलच्या मालकांनी कंपनी विकायचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितलेली किंमत आणि गूगलचे भवितव्य याबाबतची साशंकता यामुळे कोणी कंपनी घेतली नाही. गूगल सर्चची लोकप्रियता वाढतच होती. अखेर लोकप्रियतेचा फायदा घेत सुरू केलेल्या सर्च अॅडमुळे गूगलच्या वाषिर्क उत्पन्नात दरवषीर् अब्जावधी अमेरिकन डॉलरची वाढ व्हायला लागली. झाली. जी कंपनी कोणाच्या खिजगणतीतही नव्हती ती आता बलाढ्य कंपनी झाली होती.

गूगलचा सर्च अॅड हा टेक्स्ट स्वरुपाचा पर्याय लोकप्रिय झाला. गूगलवर एखादा शब्द किंवा शब्दसमूह टाइप करून सर्च देताच संबंधित वेबसाइटच्या यादीसोबत त्याच सर्चशी सार्धम्य साधणाऱ्या काही टेक्स्ट रुपातील जाहिराती स्पॉन्सर्ड लिंक मधून दिसतात. या लिंकवर क्लिक केल्यास गूगलला त्याचे पैसे मिळतात. या प्रकारात कमी खर्चात लोकांपर्यत पोहोचता येते, हे लक्षात आल्यावर अनेकांनी हा पर्याय वापरला. त्यातून गूगलचे उत्पन्न वाढले.

आपली विश्वसनीयता वाढल्याचे पाहून गूगलने असंख्य ऑनलाइन सेवा विनामूल्य सुरू केल्या. याहू आणि एमएसएन देत असलेली प्रत्येक सेवा इंटरनेटवर फुकटात देताना तिथे वेबपेजवर टेक्स्ट किंवा डिस्प्ले अथवा बॅनर जाहिराती द्यायला त्यांनी सुरुवात केली. काही वेबसाइटशी सहकार्य करार केला. 'यू ट्युब' ताब्यात घेऊन 'व्हीडिओ अॅड'ची संकल्पना पुढे आणली. मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस सूटला टक्कर देत गूगल डॉक्युमेंट, ट्रान्सलेटर, ऑनलाइन फोनसेवा देणारे जी टॉक आणि जी मेल या सेवा फुकटात देऊन याहू आणि मायक्रोसॉफ्टला हादरा दिला. गूगलच्या या वेगामुळे ते इंटरनेट सत्ता गाजवतील याची जाणीव याहू आणि मायक्रोसॉफ्टला झाली.

नेमक्या त्याच सुमारास ऑपरेटिंग सॉफ्टवेअरमध्ये निर्माण झालेल्या चुका आणि एकाधिकारशाहीविरोधी केसमुळे मायक्रोसॉफ्ट आणि गूगलला टक्कर देता येत नसल्यामुळे याहूच्या शेअरला उतरती कळा लागली. बाजारातली त्यांची पत कमी होत होती. तीच अडचण मायक्रोसॉफ्टचीही झाली. यानंतर मायक्रोसॉफ्टने याहू कंपनीशी २००५ पासून गुप्त बोलणी सुरू झाली. संपूर्ण याहू घेता आले नाही तर किमान त्यांची सर्च सेवा घेऊ असाही विचार मायक्रोसॉफ्टने केला. अनेक पर्यायांवर बोलणी झाली आणि प्रती शेअर ३३ डॉलर देण्याची तयारी दाखवून मायक्रोसॉफ्टने याहू विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र सुमारे ४७.५ अब्ज अमेरिकन डॉलरचा हा विलिनीकरणाचा प्रस्ताव याहूने तीन मे रोजी फेटाळला. त्यांना प्रतिशेअर ३७ डॉलरची अपेक्षा होती पण ती पूर्ण न झाल्याने, मायक्रोसॉफ्टने आमचे महत्त्व ओळखले नाही, असे याहूचे मालक जेरी यांग यांनी सांगितले. त्यानंतर पाच मे रोजी मायक्रोसॉफ्टने बोलणी थांबवून विलिनीकरणाचा प्रस्ताव मागे घेतला.

सर्व थंडावले असे वाटत असतानाच याहूचे शेअरहोल्डर कार्ल इकान यांनी कंपनीने शेअरहोल्डरची फसवणूक केल्याचा आरोप केला. गूगलने पडद्याआडून याहूच्या व्यवस्थापनाला मोठी रक्कम देण्याची ऑफर दिल्यामुळेच याहूने मायक्रोसॉफ्टला धुडकावल्याची चर्चा सुरू झाली. अखेर इकानने याहूचे शेअर विकत घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी वाटेल तेवढी रक्कम खर्च करण्याची तयारी करून याहूच्या व्यवस्थापनाला जाहीर आव्हान दिले.

कंपनीच्या तीन जुलै रोजी होणाऱ्या वाषिर्क शेअरहोल्डरच्या सभेपूवीर् विलिनीकरणाबाबत निर्णय घेतला नाही तर स्वत:च्या शेअरच्या जोरावर कंपनीचे व्यवस्थापन बदलून मायक्रोसॉफ्टशी बोलणी सुरू करायला लावेन असे उघड बोलून दाखवले. याआधी मी अनेक अमेरिकन कंपन्यांना असे शेअर ताब्यात घेऊन नियंत्रित केल्याचेही त्याने जाहीर केले आहे.

मायक्रोसॉफ्टचे चेअरमन स्टीव बॉल्मर यांनी याहूच्या चेअरमनना पत्र पाठवून नव्याने विचार करा, आम्ही मर्जर शक्य नसल्यास सहर्कायाच्या अन्य पर्यायांचा विचार करू असे कळवले आहे. मात्र इकानच्या हालचालींशी आपला संबंध नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्याचवेळी स्वत:च्या हितासाठी गरज पडल्यास वाटेल त्या किमतीला शेअर घेऊन याहूचे व्यवस्थापन बदलण्याचे प्रयत्न करण्याची आमची ताकद आहे, फक्त तसे करायची इच्छा नाही, असे लिहिले आहे.

या पत्रापाठोपाठ मायक्रोसॉफ्टने पुन्हा एकदा विलिनीकरणाचा प्रस्ताव मागे घेऊन जेमतेम दोन आठवडे झाले असताना याहूकडे सहकार्याचा नवा प्रस्ताव सादर करण्यास उत्सुक असल्याचे जाहीर केले आहे. काही प्रमाणात गूगलच्या जाहिरात व्यवस्थेसारखी असलेली याहूची पनामा नावाची जाहिरात व्यवस्था आणि याहू सर्च इंजिन यामध्ये आपल्याला जास्त उत्सुकता आहे असे संकेत देत कंपनीने नव्याने बोलणी करण्याची तयारी केली आहे. याबाबत अजून याहूची अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी याहूच्या व्यवस्थापनावर मायक्रोसॉफ्टशी बोलणी करण्यासाठी दबाव वाढतो आहे, हे निश्चित.

विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात डॉट कॉम बूम असताना एकदा याहूच्या प्रती शेअरचे मूल्य नॅसडॅकमध्ये ४७५ डॉलर झाले होते. अलीकडे विलिनीकरण रद्द होताच ते २३ डॉलरच्या आसपास आले होते. मायक्रोसॉफ्टची अवस्थाही तशीच आहे. विलिनीकरण रद्द झाल्यापासून नॅसडॅकवर कंपनीच्या शेअरचे मूल्य ४५ ते ५० डॉलरमध्ये काही दिवस फिरत आहे. गूगलची इंटरनेटवरील सत्ता संपवायची असेल तर याहू आणि मायक्रोसॉफ्टला ठोस पावले उचलावी लागतील. कारण मायक्रोसॉफ्ट आणि गूगल असा मैत्रीकरार सध्या तरी अशक्य वाटतो. आणि याहूने गूगलशी सहाकार्य करार करणे म्हणजे स्वत: अस्तित्व संपवण्यासारखे आहे, असे मानले जाते.

काय होईल सांगणे कठीण आहे पण इंटरनेटच्या दुनियेत नव्याला होमपेजवर फ्लॅश करण्याची आणि जुन्याला अर्काइव्हमध्ये फेकण्याचा नियम आहे. फक्त तो कुणाला लागू होतोय ते स्पष्ट व्हायला थोडा वेळ बाकी आहे इतकच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: