उद्याचे कम्प्युटर्स आपल्यासारखंच अनुभवातून शिकणारे आणि म्हणूनच वारंवार त्या चुका (न) करणारे असतील. पण माणसासारखं त्यांना मरणाचं भय नसेल! गंमत म्हणजे त्यांना भावना मात्र असतील!
कम्प्युटर्सचा इतिहास अतिशय रंजक आणि चित्तथरारक आहे. आकाराने अतिशय मोठे पण कामाला अतिशय हळू असे सुरुवातीचे संगणक असत. त्यांची कामंही अगदी बाळबोध स्वरूपाची म्हणता येतील अशी असत. एकावर एक 'व्हॅक्युम ट्युब्ज' आणि तारांची भेंडोळी यांची चवड रचून हे कम्प्युटर्स तयार केले जात. अर्थातच त्या काळापासून आजपर्यंत कम्प्युटर्सच्या आकारात प्रचंड घट, किंमतीत घसरण आणि त्याचबरोबर क्षमतेत आश्चर्य वाटेल अशी सुधारणा अशी तिहेरी प्रगती वादळी वेगानं झाली आहे. आता तर आपण कम्प्युटर विकत घेतला की काही महिन्यांतच तो जुनापुराणा ठरतो! अशा या कम्प्युटरचं भवितव्य काय आहे? त्याचं आपल्या आगामी आयुष्याशी काय नातं जडलेलं आहे? शास्त्राविषयी अनेक भाकितं करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींपासून सामान्य माणसाला याविषयी कुतुहल निर्माण होणं अगदी स्वाभाविकच आहे. अनेकांनी घरकामाला कामवाल्या बाईऐवजी यंत्रमानव (रोबो) असणं, खिशात मावतील असे कम्प्युटर्स सर्वत्र असणं, इथपासून ते आपल्या शरीरातल्या साऱ्या अवयवांवर 'नजर' ठेवू शकेल अशी 'चिप' आपण गिळणं यापर्यंत अनेक प्रकारची भाकितं केली आहेत. त्यातल्या काही गोष्टी आज निव्वळ 'सायन्स फिक्शन' वाटत असल्या तरी आजवरचा इतिहास सांगतो की 'सायन्स फिक्शन'मधल्या अशक्यप्राय कल्पना अनेकदा काही वर्षांनी प्रत्यक्षात उतरल्या आहेत. त्यामुळे उद्याच्या कम्प्युटर्सची आज केलेली वर्णनं केवळ पुस्तकातील वर्णनच बनून राहतील असं मानणं साफ चुकीचं ठरेल. कम्प्युटर्सच्या सोबतच इंटरनेट आणि मोबाइल क्षेत्रांमधील क्रांती आपलं आयुष्य पार बदलून टाकेल याची ग्वाही अनेक तज्ज्ञ देताहेत.
उद्याच्या जगातल्या कम्प्युटर्समधला एक अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे 'आटिर्फिशियल इंटेलिजन्स'. कम्प्युटर्स हे कितीही भराभर आणि न कंटाळता कामं करत असतील तरीही ते 'बिनडोक' असतात हे आपण जाणतो. पण उद्याचे कम्प्युटर्स मात्र आपल्यासारखंच अनुभवातून शिकणारे आणि म्हणूनच वारंवार त्या चुका (न) करणारे असतील. पण माणसासारखं त्यांना मरणाचं भय नसेल! गंमत म्हणजे त्यांना भावना मात्र असतील! या साऱ्याचा आपल्या आयुष्यावर काय जबरदस्त परिणाम होईल, विचार करा! त्याचबरोबर यंत्रमानवांचा वापर अधिकाधिक होत राहील. अलिकडे त्यांचा वापर माणसासाठी धोक्याची असणारी कामं (बाँब निकामी करणं, अतिशय कठीण परिस्थितीतून कुणाची तरी सुटका करणं, वगैरे) करण्यासाठी होतोच आहे. तो प्रचंड प्रमाणात वाढेल. अशा यंत्रमानवांना जर आपण त्यांनी आधी केलेल्या चुका पुन्हा न करायला शिकवलं तर अख्ख्या मानवजातीला ते केवढं वरदान ठरेल! या विचारांतूनच 'एक्सपर्ट सिस्टिम्स' नावाचं तंत्रज्ञान अतिशय जोमानं वर येतंय. 'नासा'नं बनवलेल्या अशा यंत्रमानवाचं काम अगदी मानवी मेंदूच्या धतीर्वर सुरू आहे!
सध्याचे कम्प्युटर्स ० आणि १ अशा दोनपैकी एकाच अवस्थेत काम करू शकतात. पण या तंत्रज्ञानात आमुलाग्र बदल घडवू शकणारे 'क्वांटम कम्प्युटर्स' आता जन्माला येऊ घातले आहेत. या कम्प्युटर्सचा काम करण्याचा वेग सध्याच्या कम्प्युटर्सपेक्षा कैकपटींनी जास्त असेल असा अंदाज आहे. त्यामुळे आज सोडवायला अशक्य वाटत असलेले अनेक प्रश्ान् उद्या सुटू शकतील असा अंदाज आहे. यातून काही प्रश्ान्ही निर्माण होऊ शकतील. अगदी सोपं उदाहरण घ्यायचं तर आज माहिती गुप्त ठेवण्यासाठी (उदाहरणार्थ आपले क्रेडिट कार्ड क्रमांक किंवा पासवर्डस्) जे तंत्रज्ञान वापरतात, त्यात कम्प्युटर्स अमुक अमुक गणितं ठराविक वेळेत सोडवू शकणार नाहीत या कल्पनेचा आधार घेतलेला असतो. उद्याच्या क्वांटम कम्प्युटर्सनी जर ही कल्पनाच मोडीत काढली तर माहितीच्या सुरक्षिततेविषयीचं आजचं सारं तंत्रज्ञान अगदी मुळापासून निखळून पडेल आणि अगदी नव्यानं या साऱ्या प्रश्ानंचा विचार आपल्याला करावा लागेल!
असंच दुसरं अचंबित करणारं तंत्रज्ञान म्हणजे 'नॅनोटेक्नॉलॉजी'चं. कुठल्याही गोष्टीचे अतिसूक्ष्म भाग करत करत आपण अणुंपर्यंत पोहोचलो आणि त्या अणुंचं वेगवेगळ्या प्रकारे एकत्रीकरण करून त्यातून नवनव्या गोष्टी बनवत राहिलो तर त्यातून केवढ्या निरनिराळ्या शक्यता निर्माण होतील! किंबहुना, आत्ताच या अचाट तंत्रज्ञानाचा वापर करून 'डाग पडू न देणारे शर्ट' पासून 'माणसाच्या हृदयाचं नियंत्रण करू शकणारी चिप' अशा अनेक भन्नाट प्रकारची संशोधनं सुरू आहेत! अतिशय सूक्ष्म आकाराचे 'नॅनो कम्प्युटर्स' उद्या आपलं घर, रस्ते, वाहनं, इतकंच काय पण आपण घातलेल्या कपड्यांमध्ये आणि आपल्या शरीरात सुद्धा असू शकतील! हे कसं शक्य आहे? गेली अनेक वर्षं कम्प्युटर्सच्या प्रगतीतला मुख्य वाटा सिलिकॉन या 'सेमीकंडक्टर'चा असतो. सिलिकॉनचा वापर कम्प्युटर्समधल्या वेगवेगळ्या चिप्स बनवण्यासाठी होतो. भविष्यातल्या कम्प्युटर्सच्या चिप्स या सिलिकॉनपासून बनणार नसून कार्बनच्या नॅनोट्युब्जपासून बनलेल्या असतील असाही एक अंदाज आहे. कार्बनच्या नॅनोट्युब्जचा शोध १९९१मध्ये लागला. त्यांचा आकार किती छोटा असावा? एक कार्बन नॅनोट्युब माणसाच्या केसापेक्षा लाखो पटींनी छोटी असते! मग त्यापासून बनलेले कम्प्युटर्ससुद्धा अतिसूक्ष्म असणं सहज शक्य असेल!
या लेखमालेत आपण कम्प्युटर्स आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या विविध तंत्रज्ञानांचा शक्य तितक्या सोप्या भाषेत आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्याविषयी अनेकांच्या उत्साह वाढवणाऱ्या प्रतिक्रिया प्रत्यक्ष, ईमेलवर आणि फोनवरूनही मिळाल्या. अर्थातच यापुढे जाऊन कम्प्युटर्सची जाळी कशी चालतात, इंटरनेटचं रोमांचकारक जग आज कुठे आहे आणि या सर्वांचा आपल्या रोजच्या आयुष्यात कसा वापर होतो याविषयीही बोलायचं आहे. अगदी बँकांचे व्यवहार कसे चालतात, क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स, एटीएम या साऱ्या गोष्टी कशा काम करतात? आपण घरबसल्या रेल्वे किंवा विमानाची तिकीटं कशी काढू शकतो, इतकंच काय पण रस्त्यावरचे वाहतूक नियंत्रणाचे दिवे कसे चालतात? बायोइन्फमेर्टिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, मोबाइल फोन्सची दुनिया अशा कित्येक गोष्टींविषयी भरभरून बोलण्यासारखं आहे. पण तूर्तास एक विराम घेऊया आणि या साऱ्या चित्तथरारक जगाविषयी पुन्हा कधीतरी बोलूया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा