आरएफआयडी, एम्बेडेड सॉफ्टवेअर, जीआयएस, जीपीएस, जीपीआरएस, स्मार्ट कार्डज्, वाय फाय, जीएसएम, बायोमेट्रिक्स, सीडीएमए, एमपीफोर, एमपेग... असे अनेक शब्द अलीकडे सर्रास अंगावर आदळत असतात. पण या सा - यांचा अर्थ काय? ते कसे चालतात? त्यांची सुरुवात कशी आणि केव्हा झाली?... हे सारं सोप्या भाषेत सांगणारं नवं सदर.
आजकाल कुठलीही वस्तू घ्यायला जावं तर त्याचे सेल्समन आपल्याला घाबरवूनच सोडतात. सेल फोन घ्यायला जावं तर ते म्हणतात, 'हा सीडीएमए फोन आहे.' आपण म्हणतो, 'वा! फारच छान!' पण मनातल्या मनात, 'हे सीडीएमए म्हणजे काय प्रकरण आहे?' याविषयी उगाचच भीती वाटायला लागते. म्हणजे त्यानं त्याऐवजी हा 'पीक्यूआरएस फोन आहे' असं म्हटलं तरीही, कित्येक जणं 'अरे! फारच उत्तम!!' असं म्हणतील. याचं कारण 'सीडीएमए' म्हणजे काय? हे आपल्याला माहीत नसतं. बरं हा प्राणी पुन: चांगला का वाईट याचाही पत्ता नसतो. त्यामुळे तो सेल्समन जे बोलेल त्याच्याकडे आपण कौतुकानं आणि आदरानं बघायला लागतो आणि हे जसं 'सीडीएमए'चं असतं, तसंच इतरही अनेक गोष्टीचं. मग साधारण आजुबाजूच्या संदर्भानं आपण त्याचा थोडाफार अर्थ लावतो. आणि मग काही काळानं थोड्या धीटाईनं तेच शब्द संभाषणात चातुर्यानं वापरून दुसऱ्यांना इम्प्रेसही करायला लागतो. मग ते शब्द ऐकून त्या ऐकणा-याला पुन: न्यूनगंड वाटून त्याचा आपल्याविषयीचा आदर वाढतो. मग कालांतरानं तोही ते शब्द पूर्णपणे न कळता वापरून दुस-यांवर छाप पाडायला लागतो. आणि हे दुष्टचक्र सतत चालू रहातं. पण तरी प्रत्येकाच्या मनात कुठेतरी त्या शब्दांबद्दल एक सुप्त भीती घर करून असतेच.
आणि हे फक्त शब्दांचंच होतं असं नाही, तर कित्येक सुविधांचं किंवा गोष्टींचंही. उदाहरणार्थ, आपण मित्राला एसएमएस पाठवतो तेव्हा तो मित्र त्याचा सेलफोन बंद करून झोपी गेला असेल, तर मग मी टाइप केलेला एसएमएस कुठे जातो? तो मित्र जेव्हा उठून त्याचा सेलफोन चालू करतो, तेव्हा तो त्याला कसा बरोबर मिळतो? इमेलचंही तसंच.
आपल्याला एकंदरीत टेलिफोन आणि सेलफोन यांच्या तंत्रज्ञानाविषयी खूप कुतूहल असतं. अलिकडे तर ब्रॉडबॅंड, एडीएसएल वगैरेंनी खूपच धुमाकूळ घातलाय. सेल फोन कसे काम करतात? त्यांचा शोध कुणी, कसा आणि केव्हा लावला? हे नाव कसं पडलं? आपण चालत चालत सेल फोनवर बोलतो, तेव्हा ही सगळी सेलफोनची यंत्रणा आपल्याला कळू न देता आपल्या अपरोक्ष काय काय करत असेल? ब्ल्यू टूथ कसं चालतं? अमुक अमुक रेस्तरॉं किंवा शहर 'वाय-फाय' झालंय म्हणजे काय? व्हायरस म्हणजे काय? डायरेक्टली हे प्रश्न आपल्याला भेडसावत असतात, पण आपण ते कुणाला विचारायला धजावत नाही. त्यांच्याविषयी एक्स्पर्ट कॉमेंट्स करायला लागतो.
गाण्याच्या किंवा कुठल्याही मीडियाच्या बाबतीत तेच. एमपीथ्री., एमपीफोर, एमपेग, डीव्हीडी, बीएमपी, जेपेग ङक्त ङक्त असे अनेक शब्द आपल्या कानावर आदळत असतात. आणि मग त्यांच्याविषयी आपल्या काही पक्क्या कल्पना होऊन बसतात. उदाहरणार्थ डीव्हीडी म्हणजे सिनेमा, पण डीव्हीडी हा एक फॉर्मॅट असून त्यात गाणंही साठवता येतं हे ऐकून आपल्याला नवल वाटतं. आणि मग गोंधळ वाढतो. त्यातून डिजिटल कॅमेरा (किंवा सेलफोन मधला कॅमेरा) याच्याविषयी बोलावं तर रेझोल्यूशन, पिक्सेल्स वगैरे शब्द कानावर आदळतात आणि मग उगाचच भीती वाटायला लागते.
अलिकडे आरएफआयडी, एम्बेडेड सॉफ्टवेअर, जीआयएस जीपीएस, जीपीआरएस, स्मार्ट कार्ड्ज, वाय फाय, जीएसएम, बायोमेट्रिक्स यांच्यासारखे शब्दही रोज ऐकायला येतात. त्यांचा अर्र्थ काय? ते कसे चालतात? त्यांची सुरूवात कशी आणि केव्हा झाली, या सगळ्यांविषयी आपल्याला जाणून घेण्याची इच्छा होते. उदाहरणार्थ, मोटारगाडीला पाश्चिमात्य देशात रस्त्यांची दिशा दाखवून मार्गदर्शन करणारं सॉफ्टवेअर बसवलेलं असतं. ते कसं चालतं? त्याला बरोबर डावीकडे वळा, उजवीकडे वळा हे कसं समजतं? साधी गोष्ट म्हणजे रस्त्यांवरचे ट्रॅफिक सिग्नल्स कसे चालतात? त्यात काय हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर लागतं? किंवा, डिजिटल एक्सरेज आणि कॅट-स्कॅन कसं काम करतं? कॅड कॅम म्हणजे काय? आणि बँकेतलं एटीएम कसं चालतं? किंवा, साधं क्रेडिट कार्ड कसं काम करतं? याशिवाय असंख्य गोष्टी आहेत. कम्प्युटर अॅनिमेशन, कम्प्युटर गेम्स, र्व्हच्युअल रिअॅलिटी/ स्पेशल इफेक्ट्स, नॅनोटेक्नॉलॉजी, बायोइन्फॉमेर्टिक्स आणि असे अनेक. शिवाय हे कम्प्युटरवाले उद्योगध्ंाद्यात ईआरपी, सीआरएम, एस्सीएम बिझनेस इंटेलिजन्स वगैरेंसारखे घाबरवून सोडणारे शब्द वापरतात. मग वाटलं यांच्याविषयी सोप्या भाषेत काहीतरी लिहावं.
या सगळ्यांमध्ये तंत्रज्ञानात बहुतांशी आज कम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स या दोघांचा उपयोग केलेला असतो. यालाच 'इन्फमेर्शन टेक्नॉलॉजी' (आयटी) म्हणतात. आणि ही सगळ्याच्या मुळाशी असल्यामुळे मग आपल्याला त्याविषयीही थोडीशी माहिती हवीच. म्हणजे हार्डवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर म्हणजे काय ? प्रोग्रॅम कसा लिहितात ? बग म्हणजे काय? मल्टिमीडिया म्हणजे काय? ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय? वर्ड प्रोसेसर आणि डी. टी. पी. सॉफ्टवेअर कसं चालतं? याविषयीही बोलावंसं वाटलं, आणि तिथूनच सुरुवात कराविशी वाटली.
आम्ही दोघंही गेली अनेक वर्षं या क्षेत्रात काम करत आहोत. आम्ही इन्फमेर्शन टेक्नॉलॉजीवर वेगळी आणि एकत्र अशी बरीच पाठ्यपुस्तकं लिहिली आहेत. अाणि ती जगभरही गेली आहेत. पण तरीही या सगळ्याच गोष्टींाविषयी आम्हाला इत्यंभूत माहिती होतीच किंवा आहे, असं नाही. त्यामुळेच हे करताना काही गोष्टी शिकून मग त्या सोप्या करून सांगाव्या लागणार आहेत. आणि हे शेअर करण्यातच मजा आहे. म्हणूनच ही धडपड!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा