kd Mumbai

आरोग्याची धनसंपदा समजावणारी 'हेल्प'!

केवळ आरोग्यावरील आठ हजारांहून अधिक पुस्तके, १० हजार माहितीपत्रके, तीन हजारमासिके, ५०० व्हिडिओ या साऱ्याचा लाभ तुम्ही एकही पैसा न मोजता घेऊ शकता... अशक्य वाटतंय ना? पण, सीएसटी स्टेशनपासून केवळ पाच मिनिटांवर असलेल्या 'हेल्प' या लायब्ररीमध्ये हा आरोग्यसंपन्न खजिना सर्वांसाठी मोफत खुला आहे!

डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांनी १९९७ साली हेल्थ एज्युकेशन लायब्ररी फॉर पीपलची (हेल्प) स्थापना केली ती केम्प्स कॉर्नर येथे. कॅलिफोनिर्यात त्यांनी अशी लायब्ररी पाहिली होती. भारतात तर अशा लायब्ररीची अत्यंत गरज असल्याचे त्यांना जाणवले. पुस्तकप्रेमी मालपाणींनी देशविदेशातून शेकडो पुस्तके गोळा केली होतीच. ती त्यांनी सर्वांसाठी खुली केली. त्यांनी मग जहाज, विमान, कुरियर शक्य त्या माध्यमातून परदेशांतून पुस्तके मागवली. वाचकांच्या सोयीसाठी मग त्यांनी फोर्टमधील मोठी जागा घेतली.

आज ही लायब्ररी सर्व 'हेल्दी' प्रश्नांची उत्तरे देते. अॅलोपॅथीप्रमाणेच आयुवेर्द, होमिओपाथी, अॅक्युप्रेशर, हिप्नोथेरपी या विषयांचीही मुबलक पुस्तके येथे आहेत. वाढते वजन, हृदयविकार, मानसिक रोग, डिसलेक्सिया, दमा, कॅन्सर, एड्स, किशोरांच्या समस्या यावरची पुस्तके तर आहेतच. पण दुर्धर विकार झालेल्यांनी मृत्यूला सामोरे जाण्याची मानसिक तयारी कशी करावी; याचे मार्गदर्शन करणारी पुस्तकेही आहेत. काही वेळा डॉक्टरांपेक्षा अधिक धीर समदु:खी पेशंट्सचे अनुभव ऐकल्यामुळे मिळतो. अशा मृत्यूशी यशस्वी झुंज दिलेल्या पेशंट्सचे अनुभव सांगणारी पुस्तकेही आहेत. आरोग्यविषयक एन्सायक्लोपिडिया आणि शब्दकोशही आहेत. जुन्या प्रती ५० टक्के सवलतीत विकल्याही जातात.

व्हीसीडीज आणि सीडी रोम्सही येथे पाहता येतात. प्रत काढता येते. सदस्यत्व घेऊन पुस्तके घरीही नेता येतात. 'हेल्प'मध्ये वेळोवेळी तज्ज्ञांची व्याख्याने, परिसंवाद, पेशंटचे अनुभव, फिल्म्स असे कार्यक्रमही होतात. याशिवाय, इंटरनेट आणि फोनवरूनही प्रश्नांची उत्तरे दिली जातात.

आता अहमदाबादमध्येही 'हेल्प'ची शाखा सुरू झाली आहे. याशिवाय पुण्यातही संपर्क साधला आहे, असे डॉ. मालपाणी म्हणाले. हॉस्पिटल्समध्ये पेशंट्सचे नातेवाईक तासन्तास बसतात. त्यांना आपल्या जिवलगाच्या आजाराचे स्वरूप कळावे; यासाठी हॉस्पिटल्समध्येही लायब्ररी सुरू व्हाव्यात, यासाठी डॉ. मालपाणी आता प्रयत्न करत आहेत.

डॉ. मालपाणी सांगतात, डॉक्टरांकडून फसणार नाहीत, त्यांच्याकडून योग्य माहिती मिळवतील आणि वायफळ खर्च टाळतील, असे व्हीआयपी म्हणजेच व्हेरी इन्फॉर्म्ड पेशंट्स घडविणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. अशा उत्सुक पेशंट आणि जिज्ञासूंसाठी 'हेल्प' स्वागताला सज्ज आहे!

संपर्क: ६५९५ २३९३, ६५९५ २३९४,
Emai : helplibrary@gmail.com,
Website : www.helplibrary.com

आरोग्य पुस्तकांची देशातील एकमेव लायब्ररी

सर्वाधिक व्याख्याने ठेवण्याचा विक्रम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: