kd Mumbai

गुगलची गुगली

अवघ्या १३ सेंटीमीटरच्या गुगलच्या खिडकीतून या चराचर विश्वातील प्रत्येक विषयाचा शोध घेता येतो. पण आता ते फक्त सर्च इंजिन उरलेले नाही. त्याने थेट इंटरनेटमधील पितामह असणाऱ्या मायक्रोसॉफ्टशी पंगा घेतलाय. या पंग्यात गुगल मायक्रोसॉफ्टला धूळ चारेल का?

आपलं गुगल दहा वर्षांचं झालं... गुगलच्या जन्मापासून भविष्यापर्यंतच्या नानाविध मुद्यांवर आतापर्यंत हजारो लेखकांनी कोट्यवधी शब्द लिहिले असतील. दी गुगल स्टोरी या पुस्तकाच्याच आजवर कैक लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. पण तरीही गुगलची महती सांगणारे हे गुगलपुराण संपत नाही आणि संपणारही नाही. कारण गुगल या संकल्पनेलाच मर्यादा मान्य नाही...

गुगल हा ब्रँड जन्माला आला तो गोगल या शब्दापासून. गोगल म्हणजे एकावर शंभर शून्य दिले की येणारी संख्या. (विचार तर करून पाहा, किती होतात ते?) आपल्या या सर्च इंजिनमधून इंटरनेटच्या मायाजालातील एवढ्या मोठ्या माहितीपर्यंत आपण पोहचू, हे स्वप्न गुगलच्या निर्मात्यांनी पाहिले... आणि ते पूर्ण होण्यासाठी ते आजही धडपडत आहेत. केवळ सर्च इंजिनपुरते मर्यादित न राहता नवनवीन प्रॉडक्ट्स आणत आहेत आणि सायबर दुनियेत प्रस्थापितांच्या मनोऱ्यांना सुरुंग लावत आहेत.

दहा वर्षांपूर्वी एका गॅरेजमध्ये सुरू झालेली ही छोटीशी कंपनी आज महाकाय हत्तीएवढी झाली आहे. आपल्या या गजराजाच्या चालीत त्याने अनेक छोट्यामोठ्या कंपन्यांना एकतर पायाखाली चिरडले किंवा आपल्यात सामावून घेतले. कॉर्पोरेट जगात हे होतच राहतं असं जरी म्हंटल, तरी त्यामुळे भल्याभल्यांच्या पायाखालची जमीन सरकली. याचा सर्वात मोठा धसका घेतला तो, इंटरनेटच्या आद्यगुरूने... बिल गेट्स आणि त्यांच्या मायक्रोसॉफ्टने.

खरं तर इंटरनेटच्या प्रवासात मायक्रोसॉफ्ट हा गुगलचा बापच म्हणायला हवा. कारण गुगल घडवणारे लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन जेव्हा शाळेची बुकं वाचत होते, तेव्हा बिल गेट्सची मायक्रोसॉफ्ट उभ्या जगाला इंटरनेट म्हणजे काय ते सांगत होती. पण मायक्रोसॉफ्टचा सूर्य जरासा मावळतीकडे झुकला आणि गुगलने आपले दुकान थाटले. त्या दुकानात त्यांनी अशा काही वस्तू विकायला ठेवल्या की मायक्रोसॉफ्टच्या दुकानातली गर्दी ओसरली. असं म्हणतात की ही ओसरणारी गर्दीचे बिल गेट्स यांना पाहावली नाही आणि त्यांनी निवृत्ती पत्करून समाजसेवेचे व्रत घेतले.

गुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यातील हे शीतयुद्ध तसे फार जुने म्हणता येणार नाही. कारण मायक्रोसॉफ्ट हा आजच्या इंटरनेटचा आद्यपुरुष आहे. पण आपल्या उत्पादनात आणि वितरणात त्रुटी आहेत, याची जाणीव बिल गेट्स यांना होती. १९९८च्या सुमारास त्यांनी लिहिलेल्या एका कॉर्पोरेट मेलमध्ये त्यांनी आपल्या स्टाफला वॉर्निंग दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, आपला दर्जा सुधारा... मार्केट मोठं होतंय, प्रतिस्पर्धी वाढताहेत, गाफील राहू नका. त्यांची ही वॉर्निंग मायक्रोसॉफ्टर्सनी कितपत मनावर घेतली ते ठाऊक नाही; पण ई-मार्केट मात्र प्रचंड मोठे झाले. त्यात गुगल नावाचा प्रतिस्पर्धी शड्डू ठोकून उभा राहिला, तो अगदी आजपर्यंत उभा आहे.

या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये ख-या अर्थाने जुंपली ती जी-मेलच्या लाँचच्या वेळी. फक्त सर्च इंजिनच्या धंद्यात दादा असलेल्या गुगलने ई-मेलच्या धंद्यात शिरायचा निर्णय घेतला तेव्हा. २००४चा तो काळ मायक्रोसॉफ्टच्या हॉटमेल, याहूच्या दादागिरीचा होता. 'युएसए डॉट नेट'ने आपले फुकट अकाऊंट बंद केल्यामुळे हॉटमेल, याहू यांच्याकडील ई-मेल अकाऊंट्स वाढली होती. पण त्यांनी ग्राहकांना द्यायच्या जागेसाठी मर्यादा घातली होती. त्यामुळे अनेकांना बाऊन्स मेल, स्पॅम मेलच्या गोंधळाला सामोरे जावे लागत होते. नेमक्या याच त्रुटीचा फायदा घेत जी-मेलने अनलिमिटेड स्पेस दिली आणि ई-मेलच्या किल्ल्यावरही आपले निशाण डौलात फडकावले.

इतरांसारखी फक्त ई-मेल सर्विस देऊन गुगल गप्प बसले नाही. त्याने त्या मेलसोबत इंटिग्रेटेड चॅट, इंटर्नल सर्च अशा अनेक सुविधा देण्यास सुरुवात केली. तसेच एकाच युझर अकाऊंटचा वापर करून गुगल सर्च सोबत, जीमेल, जीटॉक यांच्यासह गुगलच्या सा-या सुविधा वापरता येऊ लागल्या. त्यातच सोशल नेटवर्किंगचा फंडा आणत ऑर्कुट आले होते. साऱ्या तरुणाईला वेड लावत या ऑर्कुटने गुगलला अब्जावधींची कमाई करून दिली.

या कमाईसाठी गुगलने कधीच कॉम्प्युझरच्या खिशात हात घातला नाही. जाहिरातींचा बाजार खूप मोठा आहे. त्याचा उपयोग करून ग्राहकाला सारे काही फुक्कट देणे शक्य आहे, यावर गुगलचा ठाम विश्वास. या जाहिरातींसाठी गुगलने निवडलेला मार्गही अनोखा, इतरांना तोंडात बोटे घालायला लावणारा. गुगलला विचारलेल्या सर्चमधील किंवा आलेल्या मेलमधील शब्द निवडून त्यासंदर्भातील जाहिराती दाखवणारे अॅडसेन्स हे भन्नाट तंत्रज्ञान वापरले. त्यामुळे गुगलकडे डॉलरची गंगा वाहू लागली आणि वादाचीही. पण असे वादही गुगलसाठी काही नवीन नव्हते. प्रायव्हसीच्या मुद्यावरील अॅडसेन्सचा निर्माण झालेला वादही मिटला आणि गुगलचा धंदा जोरात सुरू झाला. अखेर याच तंत्राचा वापर करून मायक्रोसॉफ्टलाही कन्टेट अॅड्स विकसित कराव्या लागल्या.

या हाराकिरीमध्ये मायक्रोसॉफ्टला खरी झोंबली ती यावर्षी २ सप्टेंबर रोजी घडलेली घटना. याच दिवशी गुगलने मायक्रोसॉफ्टची दादागिरी असणाऱ्या इंटरनेट ब्राऊझरच्या जगात पाऊल ठेवले. इंटरनेट एक्स्प्लोररच्या मोनोपोलीला आव्हान देत गुगलच्या क्रोमने दणक्यात एंट्री मारली. जगभरातल्या कोट्यवधींनी क्रोम डाऊनलोड केले. फक्त महिन्याचं बाळ असणाऱ्या या क्रोमने बाजारात मोठी चर्चा घडवली.

या क्रोमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे की, हा ओपन सोर्स ब्राऊझर आहे. त्यामुळे ते वापरणाऱ्याला हवे तसे बदल करता येणे शक्य आहे. मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्स्प्लोररला आठ-आठ व्हर्जन काढूनही हे धाडस करता आलेले नाही. तसेच विंडोजच्या पॅकसोबत विकत मिळणाऱ्या आयईसमोर गुगलचे हे क्रोम चकटफू उपलब्ध आहे. पण आशियाई देशांमध्ये पायरेटेड सॉफ्टवेअर्स वापरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने अजूनही आयईचेच राज्य चालू आहे.

गुगल मात्र क्रोम लाँच करून शांत बसलंय. त्यांचे म्हणणे असे आहे, की आम्हाला ब्राऊझरमध्ये नंबर वन व्हायचे नाही. पण कॉम्प्युझरनी सोयीनुसार आमच्या या सॉफ्टवेअरमध्ये बिनधास्त मोडतोड करावी. आम्हाला असा विश्वास आहे, की यामुळे गुगल अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचेल. ९५ टक्के उत्पन्न फक्त जाहिरातींतून मिळविण्याची विचारपद्धतीच गुगलच्या यशाचे खरे गमक आहे.

गुगलफोन बाजारात आणून मोबाइलच्या दुनियेतही गुगल उतरले आहे. त्यातही ते ग्राहकाला खुश करतील अशी आशा आहे. पण गुगलला वेध लागले आहेत ते नव्या क्लाऊड टेक्नॉलॉजीचे... जर मी इंटरनेट वापरतो, तर मला सॉफ्टवेअर का विकत घ्यायला लागावीत? मला लागणारी सारी सॉफ्टवेअर ऑनलाईनच वापरता यायला हवीत. त्यासाठीच तर गुगलने सर्च, अॅड आणि अॅप्स हा नवा मंत्र स्वीकारलाय.

सर्च आणि अॅड्स म्हणजे जाहिरातीत गुगल दादा आहेच... पण अॅप्स म्हणजे अॅप्लिकेशन हा नवा फंडा वाढीस लागलाय. अनेकजण गुगलचे ओपन सोर्स सॉफ्टवेअर घेऊन त्यात बदल करत आहेत. क्लाऊड टेक्नॉलॉजी जसजशी विकसित होत जाईल, तशी हीच सॉफ्टवेअर गुगलचे स्ट्राँग पॉईंट ठरतील. या नव्या प्रयोगामुळे सॉफ्टवेअर किंग असलेल्या मायक्रोसॉफ्टला आणखी हादरे बसणार आहेत. मायक्रॉसॉफ्टच्या नुकत्याच झालेल्या मिटिंगमध्ये याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

पण इंटरनेटचे गमभन शिकविणाऱ्या मायक्रॉसॉफ्टशी पंगा घेणे गुगलला परवडेल?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: