kd Mumbai

बिनधास्त...खुलेआम!

इंटरनेटच्या व्यापक विश्वात खास स्त्रियांसाठी ज्या काही वेबसाइट्स, ब्लॉग्ज आहेत त्यांची माहिती देणारं हे नवं सदर.
जगातल्या वेगवेगळ्या देशात, प्रांतात राहणाऱ्या स्त्रियांचं विश्व यातून उलगडतं. त्यातून अनेकींना जगण्याची, काही वेगळं करून दाखवण्याची प्रेरणा मिळेल तर काहींना निव्वळ माहिती... आमच्याबरोबर नेटदुनियेची ही अनोखी सफर करायला सज्ज व्हा.

खरंतर इंटरनेटचं जग कधीच 'जेंडर बायस' नव्हतं आणि भविष्यातही नसेल. तरीही इंटरनेटवर स्त्रियांंसाठी एक खास कोपरा आहे. या कोपऱ्यात फक्त फॅशन, गॉसिप, रेसिपीच नाहीत, तर काही गंभीर विषयांवरही माहिती असते. अगदी आरोग्य, समाजव्यवस्थेपासून थेट लग्न, सेक्स इथपर्यंत... सारं काही बिनधास्त, खुलेआम! उगीचच कशाचाही विटाळ नाही की कशावरही पडदा नाही. हे आहे इंटरनेटवरचं बायकांचं जग... तेही फक्त बायकांसाठी नसलेलं... सर्वांना अॅक्सेसेबल, फूल टू ओपन!

इंटरनेटवर सध्या ब्लॉगचा बोलबाला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण ब्लॉग लिहिताहेत. त्यातही स्त्रियांसाठी काही खास ब्लॉग आहेत. ब्लॉग म्हणजे ऑनलाइन डायरी. या डायरीत हरघडीला काही ना काही नोंदवलं जातंय. त्याचे विषयही वेगवेगळ्या रंगाचे आणि नानाविध ढंगाचे. पण या साऱ्या ब्लॉग्सना एकत्र सांधणारं असं एक ऑनलाइन नेटवर्क आहे. http://www.blogsbywomen.org/ या लिंकवर तुम्हीही या नेटवर्कवर लॉग इन होऊ शकता.

तुम्ही ब्लॉग लिहित असाल तर तुम्ही या साइटचे मेंबर होऊ शकता. पण तुम्ही ब्लॉग लिहित नसाल तरीही वाचक म्हणून तुमचं इथं स्वागतच आहे. आजघडीला साडेपाच हजाराहून अधिकजणी या साइटच्या मेंबर आहे. त्यांच्या ब्लॉग्सची विषयानुसार वेगळी केलेली यादी 'डिरेक्टरी ऑफ ब्लॉगर्स' या लिंकवर उपलब्ध आहे. तसंच तुम्हाला तुमचा ब्लॉग या यादीत अॅड करायचा असेल, तर 'अॅड युवर ब्लॉग' ही लिंक तुम्हाला मार्गदर्शन करते. तसंच यामागचा कार्यकारणभाव सांगणारी 'बेनिफिट्स ऑफ बिंग लिस्टेड' ही लिंक होमपेजवर आहेच.

विषयवार यादींमध्ये पंचवीसेक विषयांमध्ये सर्व ब्लॉग्सची विभागणी केली आहे. त्यात सर्वाधिक ब्लॉग 'पर्सनल' या विभागात तर 'मिलटरी' या विभागात सर्वात कमी ब्लॉग आहेत. आरोग्य आणि वेटलॉस विभागात २१० तर समलिंगी संबंधाबद्दलच्या विभागात तब्बल १५७ ब्लॉग आहेत! याव्यतिरिक्त धर्म, तंत्रज्ञान, क्रीडा, राजकारण, महिला सबलीकरण, कायदा विभागात ब्लॉग लिहिणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. असेच काही लक्षणीय ब्लॉग्ज आणि वेबसाइट्सविषयी माहिती वेळोवेळी या नव्या सदरातून मिळेलच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: