kd Mumbai

सीडी आणि डीव्हीडी

आवाजाच्या सलग अॅनॅलॉग सिग्नलची अतिशय भरभर (दर सेकंदाला ८०००) अशी मोजमापं केली आणि त्या प्रत्येकांची आठ बिटस्च्या बायनरी भाषेत रुपांतर केलं, की अॅनॅलॉग आवाजाचं डिजिटलमध्ये रुपांतर होतं. मग ही बिटस् बाकीच्या बिटस्सारखीच कम्प्युटरच्या मेमरीत किंवा हार्डडिस्कवर साठवता येतात. पण गाणी एकीकडून दुसरीकडे न्यायची असणारी टेपरेकॉर्डरच्या कॅसेटमधली सोय या बिटस् आणि बाईटस्च्या रूपातल्या गाण्यांसाठी सुध्दा लागणारच की ! आणि त्यातूनच 'कॉम्पॅक्ट डिस्क' किंवा सीडीचा जन्म झाला.

सीडीचं सगळ्यात मूलभूत तत्त्व म्हणजे त्यात चुंबकीय गुणधर्माचा वापर न होता लेझरच्या तीव्र किरणांचा वापर केलेला असतो. या तत्त्वाचा शोध नेदरलॅंंडमधल्या फिलिप्स या प्रसिध्द कंपनीनं लावला. त्यावेळच्या सीडीजची लांबी ३० सेंटीमीटर्स असायची. आणि त्या सीडीज् 'लेझरव्हिजन' या नावाने विकल्या जायच्या. पण जपानखेरीज अन्य देशांत त्या फारश्या चालल्या नाहीत. या तंत्रज्ञानामागे जिम रसेल नावाच्या माणसाचा हात होता. गाण्यांची प्रचंड आवड असणाऱ्या रसेलने कॅसेटस्पेक्षा जास्त दजेर्दार आणि टिकणाऱ्या माध्यमाचा शोध घ्यायचा ध्यासच घेतला होता. लेझरचे किरण वापरून गाणी एखाद्या तबकडीवर साठवून नंतर ऐकता येतील का या प्रयत्नात त्याने अनेक वर्षे घालवली. १९६५ साली संगणक वापरून त्याने अॅनॅलॉग माहितीचं रूपांतर डिजिटल माहितीत केलंसुध्दा ! मग या गोष्टीचा पिच्छा पुरवून त्यानं या विषयातलं पेटंटसुध्दा मिळवलं. पण तो काम करत असलेल्या बॅटेल या कंपनीला रसेलच्या शोधाचं महत्त्व नीटसं न कळल्याने त्यांनी रसेलचं पेटंट फक्त एक मिलीयन डॉलर्सना विकून टाकलं! पण रसेलनं आपलं काम सुरूच ठेवलं, आणि फिलिप्स व सोनीला ते दाखवलं. पण त्यांनी त्यात सुधारणा करून स्वत:चंच तंत्रज्ञान बाजारात आणलं !

सीडीज् कशा काम करतात ? साऱ्या सीडीज् १२० मिलीमीटर्स लांबीच्या आणि १.२ मिलीमीटर्स इतक्या जाडीच्या असतात. त्यांच्या मध्यभागी १५ मिलीमीटर्स आकारांचं छिद असतं.. सोप्या शब्दात सांगायचं तर लेझर किरणांचा वापर करून सीडीच्या पृष्ठभागावर जिथे ० लिहायचा असतो तिथे काहीच केलं जात नाही. पण जिथे १ लिहायचा असेल तिथे अतिसूक्ष्म खड्डा पाडला जातो. म्हणजे गाण्यांचं रूपांतर ०-१ अशा बिटस् मध्ये करून हे बिटस् सीडीवर लेझर किरणांनी लिहून टाकायचे. जेव्हा आपण ती सीडी ऐकतो, तेव्हा एक कमी ताकदीचा लेझर किरणांचा प्रकाश सीडीच्या पृष्ठभागावरून फिरतो. मग जिथे जिथे सीडीच्या पृष्ठभागावर खड्डे असतील, तिथून त्या लेझर किरणांचा प्रकाश कमी प्रमाणात परत फिरतो . त्यांच्या तुलनेत सपाट भागावरून प्रकाश जास्त तीव्रतेने परत फिरतो. मग परावतीर्त होणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेवर न सीडीवर कुठे ० लिहिलंय आणि कुठे १ हे कळतं. मग त्या ० अाणि १ च्या ८-८ बिटसच्या तुकड्यावरून प्रथम इलेक्ट्रिक आणि नंतर आवाजाचे सिग्नल्स तयार झाल्यानं मूळचं गाणं आपण तसंच ऐकू शकतो ! सीडीचा जो भाग आपण सीडी प्लेअरवर ठेवतो त्यावर पाण्यात दगड टाकल्यावर जशी मोठीमोठी होत जाणारी वर्तुळं तयार होतात तशी गोलाकार वर्तुळं असतात. गंमत म्हणजे ही वर्तुळं आपल्या केसांच्या आकारापेक्षाही कमी जाडीची असल्याने आपल्याला दिसत नाहीत. त्याहून थक्क करणारी गोष्ट म्हणजे अशा प्रत्येक वर्तुळावर हजारो 'बिटस्' मावतात. त्या वर्तुळातले बिटस् आपण हातानं लिहिले, आणि त्यांची लांबी मोजली तर ती कित्येक किलोमीटर भरेल ! पण आता गोची अशी की सीडीच्या मध्यभागाची वर्तुळं छोटी असतात, तर कडेची मोठी. मग बिटस् सारख्या वेगानं वाचायची कशी? त्यासाठी सीडी प्लेअर जेव्हा सीडी गोल-गोल फिरवून तिच्या पृष्ठभागावरची बिटस् वाचत असतो तेव्हा तो सीडीला गोल फिरवायचा वेग बदलत राहतो.

१९८४ साली फिलिप्स आणि सोनीने या तंत्रज्ञानाचा वापर गाण्याशिवाय कम्प्युटरमधली माहिती (डेटा, टेक्स्ट) साठवण्यासाठीही करायची युक्ती शोधून काढली. त्या तंत्रज्ञानाला 'कॉम्पॅक्ट डिस्क - रीड ओन्ली मेमरी (सीडी - रॉम)' असं नाव पडलं. प्रत्यक्षात सीडी (म्हणजे गाण्यांच्या) आणि सीडी-रॉम (म्हणजे संगणकांतली माहिती साठवायच्या) सारख्याच असतात. ०-१ च्या भाषत्ेा एकात गाणी लिहिली जातात, तर दुसऱ्यात संगणकातली माहिती. सीडी-रॉमचा एक प्रमुख तोटा म्हणजे एकदा का त्यात काही लिहिलं की ते पुसता येत नाही. मग त्या बाबतीतही संशोधन होउ न 'सीडी रेकॉडेर्बल' (सीडी-आर)' नावाच्या सीडीज् आल्या. त्यात आधीची माहिती पुसून नवी लिहिता येते. हे कसं शक्य होतं ? तर सीडी वा सीडी-रॉममध्ये लेझर किरणं चक्क अॅल्युमिनियमच्या पृष्ठभागावर खडडे् पाडत असल्याने ते 'पुसता' येत नाहीत. पण सीडी-आर मध्ये असे खड्डे न पाडता एका रसायनाच्या तवंगावर खड्डे पाडून ठेवायची सोय असते. सीडी-आर 'पुसून' नवी माहिती लिहायची झाली की हे रसायन मुळच्या स्थितीत आणलं जातं!

अर्थातच अलिकडे सर्व प्रकारच्या सीडीजना डिव्हीडीनी पार मागे टाकलं आहे. त्यांचं मूळ नाव 'डिजिटल व्हर्साटाईल डिस्क'. सीडीज्सारखं तंत्रज्ञान डिव्हीडीज्मध्ये वापरलं जातं. पण त्यात फरक असा की डिव्हीडीज्मध्ये वापरली जाणारी लेझरची किरणं आणि त्यामुळे पृष्ठभागावरचे खड्डेही सीडीजपेक्षासुध्दा सूक्ष्म असतात. त्यामुळे अधिक दाटीवाटी करून डिव्हीडीज्मध्ये आणखी जास्त बिटस् 'कोंबता' येतात. त्यामुळे सीडीपेक्षा डिव्हीडीमध्ये कैकपटींनी जास्त माहिती साठवता येते.

साहजिकच अलीकडे साऱ्यांची पसंती सीडीज्च्या तुलनेत डिव्हीडीजना जास्त असते. एका डिव्हीडीमध्ये सुमारे १३ सीडीज् साठवू शकतील इतकी माहिती साठवता येते. म्हणजे डिव्हीडी फक्त सिनेमांसाठीच असते असं नाही, तर त्यात गाणीही साठवता येतात !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: