kd Mumbai

'नेट'वरची निवडणूक

अमेरिकेतल्या निवडणुकीमध्ये आपला प्रचार करण्यासाठी सर्वच उमेदवार इंटरनेटचाही वापर करीत आहेत. त्यांच्याच विविध साइट्सचा घेतलेला हा मागोवा...

सध्या अमेरिकन निवडणुकीचे मतलबी वारे जोरात वाहात आहेत. नोव्हेंबरमध्ये होणारी अध्यक्षपदाची निवडणूक डेमॉक्रॅट आणि रिपब्लिकन या दोन्ही प्रमुख पक्षांतफेर् कोणी लढवावी हे ठरविण्यासाठी देशभर मिनी निवडणुका चालू आहेत. ही प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी जॉन मॅककेन यांना मिळाली आहे. चुरस आहे ती डेमॉक्रॅटिक पक्षात. त्यासाठीचे प्रमुख प्रतिस्पधीर् बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांच्यात अद्यापही चुरस असली तरी ओबामा बाजी मारणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. दोघांचाही प्रचार वेगाने चालू आहे. अफाट पैसा त्यात ओतला जात आहे. आणखी गोळा केला जात आहे. दोन्ही उमेदवार वीसवीस तास प्रचार करत आहेत. कधी दश्य स्वरूपात तर कधी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन. तेथील वर्तमानपत्रांमध्ये एकतृतियांश भाग या प्रचारासाठी वापरला जात आहे. पण हिलरी आणि ओबामा यांच्यात आणखी एका माध्यमातून संघर्ष सुरू आहे. ते माध्यम आहे इंटरनेटचे.

निवडणुकीत उतरलेल्या सर्व प्रमुख उमेदवारांनी आपापल्या वेबसाइट्स बनविल्या आहेत. बऱ्याचश्या साइट्स त्यांच्यात्यांच्या चाहत्यांनी तयार केल्या आहेत. परंतु अधिकृत साइटचाच विचार आपण करू या. त्यावर आपली जितकी अधिक माहिती देत येईल तेवढी देण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला आहे. एवढेच नव्हे तर प्रतिस्पधीर् उमेदवार कसा 'चुकीचा' प्रचार करत आहे हे दाखविण्यासाठी वेगळा कॉलम आहे. प्रतिस्पधीर् उमेदवाराचा 'चुकीचा' प्रचार आणि त्याचा मुद्देसूद प्रतिवाद असे या कॉलमचे स्वरूप आहे. ओबामांची साइट आहे barackobama.com/index.php ती ओपन केल्यावर ओबामांचे चित्र तर दिसतेच, पण निवडणुकीची माहिती, त्यात असलेले विविध प्रश्न, त्यावरची ओबामा यांची भूमिका, वेगवेगळ्या प्रश्नांवर ओबामा यांनी प्रत्यक्षात काय कृती केली त्याचा तपशील, आतापर्यंत मतदान झालेल्या व होणार असलेल्या राज्यांचा तपशील, त्यांचे पूर्ण निकाल अशी सारी माहिती मिळते. प्रचाराच्या ताज्या बातम्या आहेतच.

सध्या ऑर्कुट, फेसबुक, मायस्पेस, फ्लिकर, यूट्यूब यांसारख्या परस्परसंवाद साधणाऱ्या सोशल साइटचाही बोलबाला आहे. बहुसंख्य तरुण मंडळी यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी साइटशी 'बांधिलकी' असणारे असतातच. त्यामुळे अशा तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी ओबामा यांनी यापैकी जवळपास प्रत्येक ठिकाणी आपले अकाऊंट ओपन केले आहे. मात्र ऑर्कुटवर ते असल्याचा उल्लेख दिसत नाही हे विशेष.

ओबामा यांच्या साइटशी स्पर्धा करणारी हिलरी क्लिंटन यांचीही साइट आहे. ती आहे hillaryclinton.com/splash. तिथेही वर उल्लेखिलेले विभाग आहेतच. शिवाय ब्लॉग्ज, प्रचाराचे व्हीडिओ आदिंचीही माहिती ठळकपणे आहे. प्रचारातील प्रतिर्स्पध्यांचा मुद्दा खोडून काढण्यासाठी एक विभाग आहेच. दोघांनाही पैशांची गरज आहे. त्यामुळे ओबामा आणि क्लिंटन यांनी 'डोनेट', म्हणजेच पैसे द्या असे आवाहन ठळकपणे केले आहे. त्यावरून लाखो डॉलर त्यांना मिळतात हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

जॉन मॅककेन यांचीही वेबसाइट आहे. ती आहे http://www.johnmccain.com/ तिथेही जवळपास असाच मजकूर आहे. पण त्यांची रिपब्लिकन उमेदवार म्हणून निवड निश्चित झाल्याने त्या साइटच्या हिट्स या दोघांच्या तुलनेत कमी असू शकतील.

ज्यांना या निवडणुकीची मूलभूत माहिती हवी आहे त्यांनी या वेबसाइट्स पाहायलाच हव्यात. कारण परदेशी वृत्तपत्रे वा मासिके सगळ्यांनाच उपलब्ध होतात असे नाही. आपल्या वृत्तपत्रांत या निवडणुकीचा पुरेसा तपशील प्रसिद्ध होत नाही. त्यामुळेही इंटरनेट मदतीला धावते. फक्त एकच खबरदारी घ्या. एकाच उमेदवाराची साइट पाहण्यापेक्षा तीनही प्रमुख उमेदवारांच्या साइट पाहा. म्हणजे निवडणुकीचे खरे चित्र तुमच्या समोर येईल. कारण शेवटी प्रत्येक उमेदवार आपल्याला सोईचाच मजकूर त्यावर देणार.

या उमेदवारांच्या अधिकृत साइटबरोबरच इंटरनेटवरच्या बातम्यांच्या साइटनीही अमेरिकन निवडणुकीसाठी खास विभाग इंटरनेटवर उघडले आहेत. सीएनएनने त्यांच्या साइटवर 'सीएनएन इलेक्शन सेंटरच' उघडले आहे. http://edition.cnn.com/POLITICS/ त्यावर अधिक माहिती आहे. या एकाच केंदात इतर साऱ्या उमेदवारांच्या साइटच्या लिंकही आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या लिंक शोधाव्या लागत नाहीत. प्रत्येक उमेदवारांचे सल्लागार कोण आहेत तेही दिले आहे. म्हणजे सारा मामला खुला आहे. सीएनएनप्रमाणेच बीबीसीच्या साइटवरही वेगळा विभाग उघडण्यात आला आहे. http://tinyurl.com2l94pt . (दोन आकड्यानंतर स्मॉल एल आहे) सीएनएन व बीबीसी या दोन्हींच्या दर्जातला फरक इथे तुम्हाला लगेचच जाणवेल. या साइटवर उमेदवारांची प्रोफाइल्स वाचायला मिळतील, शिवाय ताज्या बातम्याही असतील. हीच सोय याहूनेही उपलब्ध करून दिली आहे. त्यांची लिंक आहे. http://news.yahoo.com/election/2008

अमेरिकन वृत्तपत्रांच्या लिंक ओपन केल्यात तरी निवडणुकीची पुरेशी माहिती मिळेल. त्यातील काही खाली देत आहे.

http://www.nytimes.com/pages/politics/index.html

http://www.washingtontimes.com/news/politics/

http://www.iht.com/indexes/special/uselections2008/index.php u

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: