kd Mumbai

इंटरनेट सेवा पूर्वपदावर

इजिप्तच्या समुदातून जाणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय इंटरनेट केबल्सना जहाजांचा मार लागून बाधित झालेली जगभरातील इंटरनेटसेवा शुक्रवारी पुन्हा पूर्वपदावर आली. त्यामुळे पावला-पावलाला इंटरनेटवर अवलंबून राहणाऱ्या इंटरनेट ग्राहकांचा जीव भांड्यात पडला आहे.

केबल्समधील बिघाडाचा प्रभाव बुधवारी रात्रीपासून जाणवू लागला. ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन इंटरनेट सेवा पुरवठादारांनी तात्काळ ही सेवा अन्य मार्गांवर वळवण्याचे प्रयत्न सुरू केले. पर्यायी मार्गाकडे सेवा वळवण्याचे काम शुक्रवारी दुपारपर्यंत पूर्ण झाल्याने सर्व सेवा पूर्ववत झाली. प्रामुख्याने भारत व पश्चिम युरोपला जोडणाऱ्या केबल्सना जहाजाच्या नांगराचा मार लागल्याने हा अडथळा उद्भवल्याचे इंटरनेट सेवा पुरवठादार संघटनेचे अध्यक्ष राजेश छारिया यांनी सांगितले.

केबल बिघाडाच्या या घटनेमुळे जवळपास ५० ते ६० टक्के सेवा विस्कळीत झाली. भारताबरोबरच युरोप व अमेरिकेतील इंटरनेट सेवेवरही याचा परिणाम झाला. मोठ्या बीपीओ कंपन्यांकडे बॅकअपची सुविधा असल्याने त्यांना याची झळ बसली नाही. मात्र लहान बीपीओ कंपन्यांना याचा फटका बसल्याचे छारिया म्हणाले. या प्रश्नी गुरुवारी दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांची इंटरनेट सेवा पुरवठादारांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक झाली. केबल्सच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन त्या कार्यरत होण्यास किमान दहा ते बारा दिवस लागतील. तोपर्यंत पर्यायी मार्गानेच सेवा सुरू राहील, असे छारिया यांनी सांगितले. विदेश संचार निगम लिमिटेड, रिलायन्स व भारती एयरटेल इजिप्तच्या संपर्कात असून दुरुस्तीच्या कामाचा पाठपुरावा करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: