kd Mumbai

फायरफॉक्सची सरशी!

फायरफॉक्स हा ब्राऊझर आतापर्यंत चांगलाच रुळला आहे. इंटरनेट एक्स्प्लोररने आठवी आवृत्ती लोकांपर्यंत पोचवली असली तरी फायरफॉक्स हाच सर्वांचा आवडता ब्राऊझर होत आहे. याचा वापर वाढत असल्याने याचे काही शॉर्टकट्स अथवा युक्त्या देणे क्रमप्राप्त ठरते. त्यातील काही रोजच्या उपयोगाच्या इथे देत आहे.

स्पेसबार हा तसा कीबोर्डवरचा दुर्लक्षित भाग. अशा अर्थाने की टाइप करत असताना दोन शब्दांच्या मध्ये स्पेस सोडण्यासाठीच त्याचा वापर होतो. पण फायरफॉक्स चालू असेल तर हाच बार पेज वरखाली करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. नुसता स्पेसबार मारलात की पेज खाली जाते, शिफ्ट व स्पेसबार एकदम मारल्यास पेज वर जाते.

आपण एखाद्या विषयाचा सर्च दिला आणि ते पेज ओपन झाले की काही वेळा गोंधळून जायला होते. इतका मजकूर असतो की आपल्याला हवा असलेला नेमका भाग कोणता हे कळत नाही. अशा वेळेला कंट्रोल एफ आपल्या मदतीला येते. येणाऱ्या बॉक्समध्ये स्क्रीनवरच्या मजकुरात आपल्याला हवा असलेला एखादा शब्द टाइप केला की लगेच तो शब्द हायलाइट होतो. मग सर्च अधिक नेमका होतो.

तुम्ही वेगवेगळ्या साइट्स पाहत असता, मध्येच एखाद्या साइटचा बुकमार्क करावा असे वाटते. प्रत्येकवेळेला वरच्या भागात जाऊन बुकमार्क धिस पेज असे म्हणून वेळ घालविण्यापेक्षा 'कंट्रोल डी' करा. एक विंडो ओपन होईल. मग त्या साइटचा बुकमार्क करा.

साधारणपणे आपण सर्वजण फायरफॉक्स वापरताना टॅब 'ऑन' केलेले असतात. (नसल्यास टूल्स - ऑप्शन्स - टॅब्जमध्ये जाऊन ऑन करू शकता) तसे केल्याने एकाचवेळेस तुम्ही जास्तीत जास्त साइट्स ऑन ठेवू शकता. एखादी साइट पाहून झाली की न घालवता दुसऱ्या टॅबमधल्या साइट्स पाहू शकता. नवीन टॅब उघडायचा असला तर 'कंट्रोल टी' करा. बरेच टॅब ओपन झाले तर एका टॅबमधून दुसऱ्या टॅबमध्ये जाण्यासाठी 'कंट्रोल टॅब' (साधारणपणे कीबोर्डवरची कॅप्स लॉकवरची की) करा. भराभर वेगवेगळे टॅब पाहता येतील.

इंटरनेट सर्च करायचा असेल तर आपण वरच्या ओळीत असणाऱ्या गूगल अथवा कोणत्यातरी सर्चचा वापर करतो. तिथे जाण्यासाठी 'कंट्रोल के' करा. कर्सर थेट सर्च बॉक्समध्ये जाईल. सर्चबॉक्सऐवजी थे अॅड्रेसबारमध्ये जायचे असले तर? 'कंट्रोल एल' पुरेसे आहे.

तुम्ही एखादी साइट ओपन केलीत, पण त्यावरचा मजकूर फार लहान आकारात दिसत असला तर? 'कंट्रोल व बरोबरीची खूण असलेली की (बॅकस्पेस कीच्या बाजूला) मारली की आकार मोठा होतो. ज्येष्ठ नागरिकांना कम्प्युटरवरचा लहान मजकूर दिसायला, वाचायला त्रास होतो. त्यांना ही साधी युक्ती करता येईल. तेच सूत्र वापरून कंट्रोल व वजाबाकीची खूण असणारी की दाबली की आकार कमी होतो.

एखादा टॅब बंद करायचा असेल तर त्या टॅबवर जाऊन 'कंट्रोल डब्ल्यू' करा. तो लगेच बंद होईल. फायरफॉक्सकडून काही मदत हवी असली तर 'आल्टर एच' करा. हेल्पलाइन समोर येईल. तुम्हाला हव्या त्या लाइनवर क्लिक करुन सर्च करा.

आपण अॅड्रेस बारमध्ये एखादा अॅड्रेस टाइप करतो तेव्हा सुरूवातीला डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू अथवा शेवटी डॉट कॉम असे टाइप करावे लागते. पण फायरफॉक्समध्ये तसे करण्याची गरज नाही. तुम्ही नुसते महाराष्ट्रटाइम्स असे म्हणा व 'कंट्रोल एंटर' मारा. मग डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू आणि डॉट कॉम आपोआप टाइप होईल. मग पुन्हा एंटर मारल्यावर ती साइट समोर येईल. तुमचा पत्ता डॉट नेट असला तर? मग 'शिफ्ट एंटर' मारा. शेवटी डॉट ऑर्ग असले तर 'कंट्रोल शिफ्ट एंटर' मारा.

अशा शॉर्टकटनी काम लवकर होते. फायरफॉक्सच्या अनेक थीम्स आहेत. टूल्स - अॅडऑन्स मध्ये जाऊन त्या लोड करता येतील. तुम्हाला फायरफॉक्सचा स्क्रीन जास्तीत जास्त वापरता यावा यासाठी काय करता येईल? त्यासाठी लिट्लफॉक्स हा अॅडऑन लोड करावा लागेल. त्याने सगळी बटन्स लहान होतात. स्क्रीन मोठा होतो. वेगवेगळी फॅन्सी थीम्स वापरणाऱ्या लोकांना हा लूक अजिबात आवडणार नाही. पण केवळ लूक महत्त्वाचा की व्यवहार्यता हे ज्यानेत्याने ठरवावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: