kd Mumbai

नवे होमपेज आणि शॉर्टकट!

मायक्रोसॉफ्टने नुकतेच त्यांचे 'बिंग' हे सर्च इंजिन वाजतगाजत बाजारात आणले आणि याहूनेही त्यांचे सर्च इंजिन सुधारले. आता दोघांच्या एकत्र येण्याने काय फरक पडतो ते पाहावे लागेल. तूर्त तरी त्यांचे सहजीवन दहा वर्षांपुरतेच ठरले आहे.

अखेर मायक्रोसॉफ्ट आणि याहू यांचे मीलन झालेच. गुगलला लढत देण्यासाठी दोघांनाही एकत्र येणे आवश्यक होतेच. कारण दोघांकडेही एकट्याने गूगलशी लढण्याची ताकद नव्हती. आता दोघेही सर्च इंजिनसाठी एकत्र आले आहेत. मायक्रोसॉफ्टने नुकतेच त्यांचे 'बिंग' हे सर्च इंजिन वाजतगाजत बाजारात आणले आणि याहूनेही त्यांचे सर्च इंजिन सुधारले. आता दोघांच्या एकत्र येण्याने काय फरक पडतो ते पाहावे लागेल. तूर्त तरी त्यांचे सहजीवन दहा वर्षांपुरतेच ठरले आहे. या काळात गूगलवर मात करण्यासाठी ते जे काही करतील ते तुमच्या माझ्यासाठी लाभदायी असेल यात शंका नाही.

याहू स्वत:चे नवीन होमपेज तयार करत आहे. ते मला तरी आवडले. www.yahoo.co.in/trynew असे ब्राऊझरमध्ये टाइप करा आणि एंटरचे बटन दाबा. या साइटची शक्ती डाव्या बाजूच्या उभ्या कॉलममध्ये आहे. एकाच साइटवर अनेक साइट पाहता येतात हे याचे वैशिष्ट्य आहे. त्यात 'माय फेवरिट्स' या हेडखाली अनेक साइट दिसतील. त्यातल्या काही नको असल्या तर त्या तुम्ही काढून टाकू शकता वा वरच्या 'अॅड' बटनावर क्लिक करून तुमच्या आवडत्या साइट अॅडही करू शकता. (मात्र त्यासाठी तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असलेल्या 'लॉगिन' बटनावर क्लिक करावे लागेल. तुमचा याहूचा ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. नसला तर दोन मिनिटांत शेजारच्याच बटनावर क्लिक करून तो तयार करू शकता). आपण एखाद्या साइटचा बुकमार्क करतो तसाच हा प्रकार आहे. पण यात 'प्रीव्ह्यू'ची सोय असल्याने तुम्ही त्या साइटच्या नावावर माऊसचा कर्सर नेल्याबरोबर ती साइट ओपन होते. महत्त्वाच्या बातम्या अथवा त्या साइटवर जे काही असेल ते दिसते. त्यातील काही वाचायचे असेल तरच क्लिक करा अथवा कर्सर दुसऱ्या साइटवर न्या. या डाव्या कॉलमच्या शेजारी पानाच्या मध्यभागी 'याहू न्यूज' आहेत. त्या बातम्याही ताज्या असतील याची खबरदारी घेतली गेली आहे.

मी मागच्या एका लेखात 'वर्ड फाइलमध्ये तुम्ही फोटो टाकू शकता' असे म्हटले होते. पण तसे फोटो टाकल्याने फाइलची साइझ मोठी होते आणि मग ती फाइल लोड व्हायला वेळही लागतो. तुम्ही वर्ड २००३ वापरत असाल तर एक सोपी युक्ती करता येईल. वर्ड ओपन करून 'टूल्स - ऑप्शन्स'मध्ये जा. नंतर 'व्ह्यू'मध्ये जा. तिथे 'यूज द पिक्चर प्लेसहोल्डर्स'चा बॉक्स चेक करा. ओके म्हणून बंद करा. आता तुम्ही जेव्हा वर्डमध्ये पिक्चर टाकाल, तेव्हा त्या फोटोच्या आकाराची चौकोनी बॉर्डर फक्त दिसेल. फोटो दिसणार नाही व फाइलही हेवी होणार नाही. मग सगळे फोटो प्लेस केल्यावर ते योग्य आहेत की नाही ते कसे कळेल? मग 'फाइल प्रिंट प्रीव्ह्यू'मध्ये जा, सगळे फोटो नीट दिसतील. त्याचा प्रिंटही व्यवस्थित येईल.

तुम्ही वर्ड २००३ अथवा २००७मध्ये काम करत असलात तर एक गंमत करून पाहा. समजा तुम्ही काही फाइल्स तयार करत आहात. त्यातल्या काही फाइल्समध्ये काही मजकूर आहे व काही वेगळा आहे. समान मजकूर असला तर तो तुम्हाला परत परत टाइप करायला लागतो किंवा जुनी फाइल ओपन करून तो मजकूर कॉपी करायचा व नव्या फाइलमध्ये पेस्ट करायचा. यात घाईत नवीन फाइल चुकून क्लोज झाली तर? तीही सेव्ह न करता? तुम्हाला जो परिच्छेद अथवा ओळी परत परत लागणार आहेत तेवढ्याच सिलेक्ट करा. तुमची वर्डची विंडो लहान करा. डेस्कटॉप दिसण्याएवढीच. तो सिलेक्ट केलेला मजकूर 'पकडून' डेस्कटॉपवर नेऊन ठेवा. मात्र हे करण्यासाठी वर्डमधली 'ड्रॅग अँड ड्रॉप' ऑप्शन ऑन केलेले असले पाहिजे. (वर्ड २००३मध्ये टूल्स - ऑप्शन्स - एडिट - ड्रॅग अँड ड्रॉप या मार्गाने जा) हा बाहेर आणलेला मजकूर आपोआप 'डॉक्युमेंट स्क्रॅप' नावाने सेव्ह होतो. त्यातील मजकुराच्या पहिल्या दोन-तीन शब्दांचे नाव त्या फाइलला आपोआप मिळते. मग जेव्हा दुसऱ्या फाइलमध्ये तो मजकूर घ्यावा लागेल तेव्हा डेस्कटॉपवरच्या त्या फाइलवर डबलक्लिक केले की तो ओपन होईल. तो कॉपी करा व हव्या त्या फाइलमध्ये पेस्ट करा. यात सोय एवढीच की प्रत्येक वेळा जुनी फाइल ओपन करून कोणता मजकूर कॉपी करायचा आहे हे शोधावे लागत नाही. ती फाइल डेस्कटॉपवर तयारच असते.

कम्प्युटर माणसाला आळशी बनवतो, तो असा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: